केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार गावातील ६० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक व ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी चास आरोग्य केंद्रात जाण्या-येण्यासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे सामाजिक भावनेतून मोफत वाहन, चहा, पाण्याची सुविधा पुरविण्याचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात गावातील १४० वयोवृद्धांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
लसीकरण केंद्रात जाण्याची सोय नाही त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक गरजू व वयोवृद्ध नागरिकांना इच्छा असूनही केवळ जाण्यायेण्याची सोय नसल्याने आरोग्य केंद्रात जाऊन लस घेता येत नाही. ही बाब विचारात घेऊन सारोळा कासार येथील लोकनेते आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकवर्गणी करत या वयोवृद्धांसाठी सामाजिक भावनेतून मोफत वाहन, चहा, पाण्याची सुविधा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक नेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, मार्केट कमिटी निरीक्षक संजय काळे, दूध संघाचे संचालक राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कडूस, नामदेव काळे, गजानन पुंड, संजय पाटील, सुनील हारदे, सुभाष धामणे, महेश धामणे आदी परिश्रम घेत आहेत.