चालू शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीचा विचार करता, अनेक मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे शाळांचे कामकाज ऑनलाइन चालू होणार आहे. सर्वसामान्य पालकांना आपला मुलगा चांगल्या शैक्षणिक संकुलात शिकविण्याची इच्छा असते, परंतु प्रवेश फीमुळे मुलांचा प्रवेश इतर ठिकाणी होतो. चालू शैक्षणिक वर्षात सेमी व मराठी माध्यमांच्या सर्व वर्गांचा प्रवेश रयत संकुलाने मोफत देऊन मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे काम केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या धोरणानुसार सर्व वर्गांचे प्रवेश मोफत देण्याचा निर्णय झाला.
श्रीगोंद्यातील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात मोफत प्रवेश घेऊन आपण निश्चिंत राहा, असे आवाहन जनरल बॉडी सदस्य कुंडलिक दरेकर यांनी केले.
उत्तर विभागात श्रीगोंदा संकुलाचे स्पर्धा परीक्षेचे निकाल उत्कृष्ट आहेत, अशी माहिती प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी दिली. गुणवंत मुले घडविण्यासाठी रयत संकुल अतिशय महत्त्वाची भूमिका सर्व शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करतात, अशी माहिती मुख्याध्यापिका वंदना नगरे यांनी दिली.
या आढावा बैठकीत सेवानिवृत्त शिक्षक बी.के. राहिंज व मोहन ससाने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ज्योत्स्ना भंडारी, बाळासाहेब जाधव, गीता चौधरी, उत्तम बुधवंत, दिलीप भुजबळ, विलास लबडे, राजेंद्र खेडकर, संतोष शिंदे, सुधाकर जानराव, के.डी. शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वसंत दरेकर यांनी केले. राजेंद्र खेडकर यांनी आभार मानले.