लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोणी गरीब असो की कोणी श्रीमंत...कोणी साधा असो की नावाजलेला..एका अंत्यविधीला किमान शंभर लोक ांची तरी अमरधाममध्ये उपस्थिती असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मात्र किमान १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. अंत्यदर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनातल्या मनातच दाबून ठेवत नागरिक कोरोनाच्याविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. बाहेर पडले की पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतात. शिवाय गर्दी झाली तर संसर्ग होऊ शकतो. म्हणून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत. तसेच अमरधाममध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळावे, असेच शासनाचे निर्देश आहेत. सध्या अमरधाममध्ये रोज सात ते आठ जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सरण रचण्यात वेळ जातो. तसेच लोकांना बराच वेळ थांबावे लागते. हा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश अंत्यविधी विद्युत दाहिनीत केले जात आहेत. सात-आठपैकी एखाद्याच अंत्यसंस्कार जाळीत लाकडे ठेऊन केला जातो. अत्यंत कमी वेळेत अंत्यसंस्कार उरकले जातात. विधी करण्यातही फारसा वेळ घालविला जात नाही. लोक फोनवरून चौकशी करतात, मात्र नातेवाईकही अमरधाममध्ये येऊ नका, असेच सांगत आहेत. काही मित्र, स्नेही निधनाची वार्ता कळाल्यानंतर शक्य झाले तरच घरी अंत्यदर्शन घेऊन येतात. गर्दी टाळण्यासाठी तेही अमरधाममध्ये जात नाहीत. अमरधाममध्ये दहा-पंधरा लोकही मास्क लावूनच येतात. तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याने कोणही चर्चा करण्यात वेळ घालवित नाही.-----बाहेरगावचे अंत्यविधी वाढलेनगर तालुका व ग्रामीण भागातील काही अंत्यविधीही नगरच्या अमरधाममध्ये होत आहेत. नगरच्या रुग्णालयात कोणी गेला तर त्याला गावात येऊ दिले जात नाही. कोरोनाच्या भितीमुळे रुग्णालयात निधन झालेल्या व्यक्तीवर अमरमधाममध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्या गावातील मोजके नातेवाईक नगरमध्ये बोलवले जातात आणि इथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होतात, असे अमरधाममधील व्यवस्थापक स्वप्नील कुरे यांनी सांगितले.-------अपघातात मृत्यू पावणारे झाले कमीदिवसभरात दोन- तीन जण अपघातात मरण पावलेले असतात. अचानक मृत्यू झाल्याने अशा अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्र परिवार जमतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे वाहनेच रस्त्यावर येत नाहीत. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी झाल्याने अंत्यसंस्कारांची संख्या कमी झाली आहे,असेही स्वप्नील कुरे म्हणाले.-------------------दहाव्यालाही फक्त घरचेच येतातदहाव्याच्या कार्यक्रमाला एरव्ही मोठ्या संख्येने गर्दी असते. सध्या लॉकडाऊनमुळे फक्त घरातीलच व्यक्ती दहाव्याच्या कार्यक्रमाला येतात. दहाव्याचे कार्यक्रम होतात, मात्र पण मित्र परिवार, नातेवाईकही येत नाहीत. फक्त घरातील लोक आणि गुरुजी असतात. असे विधीही सकाळी नऊच्या आत होऊन जातात.
चार खांदेकरी...चार शेजारचे अन् चार नातेवाईक,अमरधाममध्ये ‘स्मशान शांतता’ : विद्युत दाहिनीतच होतात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:45 IST