अहमदनगर : नवीन टिळक रोडवरील अॅक्सिस बँकेतून एका उद्योजकाने काढलेले चार लाख रुपये चार अज्ञात इसमांनी लांबिवले. दुचाकीला लटकविलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास टिळक रोडवर घडली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने धाव घेतली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. नगर येथील सुधीर कृष्णा आहेर (वय ४०, रा. निर्मलनगर, गाडेकर चौक, अहमदनगर) यांनी ही रक्कम बँकेतून काढली होती. आहेर यांनी सकाळी ११.३० वाजता पोस्ट कार्यालयातून जावून पीपीएफच्या खात्यात दहा हजार रुपये भरले. तेथून ते स्वस्तिक चौकातील अॅक्सिस बँकेत गेले. तेथे धनादेश देवून चार लाख रुपये काढले. हे पैसे त्यांनी काळ््या रंगाच्या पिशवीत ठेवले. ही पिशवी बुलेट वाहनाच्या हॅण्डलला अडकविली आणि घरी निघाले. यावेळी हॉटेल चंद्रमा जवळ (नवीन टिळक रोड) ते आले असताना दुचाकीच्या डाव्या व उजव्या बाजुने चार अनोळखी इसम आले. तुमच्या पिशवीमधील नोटा पडल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मागे पाहिले असता रस्त्यावर नोटा पडलेल्या होत्या. नोटा पाहून आहेर यांनी त्यांची पिशवी हॅण्डलला अडकवून रस्त्यावर पडलेले पैसे घेण्यास आले. यावेळी दोघा जणांनी हॅण्डलला अडकविलेली पिशवी घेतली आणि पळ काढला. त्याचवेळी आरडाओरडा केला, मात्र ते पळून गेले. त्या दोघांचा पाठलाग केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या पिशवीमध्ये रोख चार लाख रुपये, पास पोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, खरेदी खत, शहर सहकारी बँकेचे दोन चेकबुक, अॅक्सिस बँकेचे चेकबुक, पोस्ट आॅफिसचे तीन पासबुक असे साहित्य होते. (प्रतिनिधी)
उद्योजकाचे चार लाख लांबविले
By admin | Updated: July 7, 2016 23:23 IST