संगमनेर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाºया चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान घडला.बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०) सागर जयमोहन जनवेजा (वय ३८), इंद्रजीतसिंग सुभाष बत्रा (वय ३६), शिवकुमार मनोजकुमार कालडा (वय २७) सौरभ अरविंद पापडेजा (वय २८) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील पंजाबी बांधवांच्यावतीने बसस्थानकासमोरील गुरूद्वारा येथे गरजुंसाठी जेवण बनविण्यात येते. त्यानंतर जेवणाची पाकिटे बनवून ती ग्रामीण भागातील गरजुंना पोहोच केली जातात. तालुक्यातील कौठे कमळेश्वर व निळवंडे परिसरातील गरजुंना जेवणाची पाकिटे देण्यासाठी सहा जण हे चारचाकी वाहनातून निघाले होते. कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान या वाहनाचे मागील दोन्ही टायर फुटुन अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यातील जेवणाची पाकिटे रस्त्यावर सर्वत्र विखुरली होती.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक जखमींना मदत उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला अपघात, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 21:03 IST