अहमदनगर: एका महिलेच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला माजी कस्टम अधिकारी आणि त्याचा पुत्र यांना देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये दोघांचेही पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान दर सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीसह पिता-पुत्रांना जामीन मंजूर केला आहे.सोनाली दुष्यंत मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिले लग्न झालेले असातानाही दुसरे लग्न करून फसवणूक केली. तसेच हुंडाबळीसाठी छळ केल्याप्रकरणी दुष्यंत (पती ) आणि माजी कस्टम अधिकारी हरिश्चंद्र मते (सासरा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दोघांपैकी दुष्यंत याला बुधवारी, तर सासरे हरिश्चंद्र मते याचा गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. दोघेही देशाबाहेर जाणार नाहीत, यासाठी दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान तिसरा आरोपी दीर नुकुल याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. सचिन सूर्यवंशी, तर आरोपीतर्फे अॅड. धैर्यशील वाडेकर आणि अॅड. विक्रम वाडेकर यांनी काम पाहिले. दरम्यान या प्रकरणात परदेशात राहणाऱ्यांना देशात आल्यानंतर मुली पुरविण्याचे रॅकेट असल्याबाबत अद्याप कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नाही. (प्रतिनिधी)
माजी कस्टम अधिकाऱ्याचा पासपोर्ट जप्त
By admin | Updated: June 27, 2014 00:18 IST