शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयासाठी दारोदार फिरावे लागते आहे. या भीषण परिस्थितीत नगरपालिका प्रशासन कोरोना रुग्णालय सुरू करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. त्यातच भर म्हणून पालिकेने मोठा गवगवा केलेल्या जन आरोग्य विम्यासाठी आर्थिक तरतूद करूनही तो अंमलात आणला नाही, असे ससाणे यांनी पत्रकात म्हटले आहे.
पालिकेने मार्च महिन्यात घेतलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शहरातील सर्व नागरिकांचा व पालिका कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना वगळून इतरांचा विमा करण्याचे सभागृहात ठरले होते. यासाठी करण्यात आलेली ५० लाख रुपयांची तरतूद वाढवून अडीच कोटींची करावी असा प्रस्ताव अनेक नगरसेवकांनी ठेवला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र चर्चा होऊन दीड महिना झाला तरी एकही नागरिकाला या योजनेचा फायदा मिळालेला नाही.
नागरिकांना खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. हा विमा योग्य वेळी काढला गेला असता तर त्याचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे लाखो रुपये वाचले असते. त्यामुळे पालिकेने केवळ प्रसिद्धी करता हा फार्स केला का, असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला आहे.
लाखो रुपये खर्च करून उपचार घेणाऱ्या नागरिकांना योजनेच्या माध्यमातून पैसे परत मिळतील का असा प्रश्न पडल्याची टीका करण्यात आली आहे.
------