अहमदनगर : सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असलेली भविष्य निर्वाह निधीची सोय आता खासगी कर्मचारी व सामान्य नागरिकांनाही होणार असून, पोस्ट विभागाने ही योजना जिल्ह्यात आणली आहे. दरवर्षी एकदा पैसे भरून १५ वर्षांनी त्याचा सव्याज परतावा मिळणार असल्याने सर्वसामान्यांना सुरक्षित व फायद्याचा गुंतवणूक मार्ग खुला झाला आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ) असे या योजनेचे नाव असून, पोस्ट विभागाने जिल्ह्यातील प्रमुख शाखांत ही योजना सुरू केली आहे. कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त १ लाख रूपये गुंतवून योजनेसाठी खाते उघडला येईल. यासाठी वार्षिक ८.७ टक्के व्याज मिळणार आहे. खात्यात वर्षांतून एकदा व्यवहार होणे गरजेचे आहे. पीपीएफमध्ये जमा होणारी रक्कम ही एकूण संपत्ती करातून मुक्त असते. काही कारणांनी वर्षभरातही हप्ता गेला नाही, तर खाते खंडित होते, परंतु ५० रूपये दंड भरून खाते पूर्ववत करण्याची सोय विभागाने करून दिली आहे. शिवाय ‘माय स्टॅम्प’ योजनाही पोस्टाने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक एस. एस. शिरसी, विपणन अधिकारी यू. डी. शेख, वरिष्ठ पोस्टमास्टर आर. ए. धस, जनसंपर्क अधिकारी बी. डी. निंबाळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)कर्जाची सोय पीपीएफ योजनेत खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी कर्जही मिळू शकते. हे कर्ज पहिल्या वित्तीय वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या रकमेच्या २५ टक्के असू शकते. ते ३६ हप्त्यांत फेडण्याची सवलत देण्यात आली आहे. गुंतवणुकीस हात न लावता कर्जाची सोय होणार असल्याने सामान्यांच्या दृष्टीने योजनेचे महत्व आणखी वाढते. ‘माय स्टॅम्प’ योजनाया योजनेंतर्गत कोणालाही आपले पोस्ट तिकीट तयार करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पोस्ट विभागाकडे देऊन भाग घेता येईल. यात ३०० रूपये भरून पाच रूपयांची १२ तिकिटे छापून मिळणार आहेत, ज्यावर आपण दिलेले चित्र, लोगो किंवा स्वत:चे छायाचित्र छापून घेता येईल.
सामान्यांसाठीही भविष्यनिर्वाह निधी
By admin | Updated: July 6, 2014 00:17 IST