श्रीगोंदा : कोरोना लाॅकडाऊन काळात श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारातील काळेवाडीतील कोरोनायोद्धा तरुणांनी दीड एक माळरानावर विविध प्रकारचे वृक्षारोपण केले. अवघ्या दहा महिन्यांत ते माळरान वनराईने फुलविले आहे.
चिंभळे येथील दत्तात्रय लगड, अरविंद गायकवाड, हर्षद गायकवाड, रोहित गायकवाड, सुभाष गायकवाड, दादा गायकवाड, अमोल गायकवाड, आशुतोष गायकवाड, सुनील गायकवाड, रावसाहेब गायकवाड यांनी एकत्र घेऊन घरात बसण्यापेक्षा आपल्या वाडीत श्रमदानाचा जागर करून नवीन काहीतरी निर्माण करायचे असा विचार मांडला. त्यावर सामाजिक कार्यकर्ते उद्धव गायकवाड यांनी काळेवाडी परिसरात वृक्षारोपण करण्याची सूचना मांडली.
प्रथम झाडासाठी खड्डे खोदले. पाण्याची व्यवस्था केली. दीड एकर जागेला कंपाऊंड करून चिंच, वड, पिंपळ, लिंब, बोर, आंबा, नारळ, हारकस, बाॅटल ट्री सारखी ६०० झाडे लावली.
पाण्याचे व्यवस्थापन चोख केले. नऊ-दहा महिन्यांत झाडे मोठी झाली. या झाडांवर पक्ष्यांनी घरटी केली. येथे पक्षीच पक्षी दिसू लागले. त्यामुळे काळेवाडीच्या ओसाड माळरानावर निसर्गशांतीचा जागर सुरू झाला आहे.
फोटो : ३० वनराई
काळेवाडी येथे युवकांनी लावलेली झाडे.