अहमदनगर : अकोले तालुक्यातील गणोरे येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.पतसंस्थेने सहकार आयुक्तांच्या पॅनेलवरील एस. एस. सोमाणी अँड असोसिएटस् चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती केली होती. संस्थेनेच नेमलेल्या या सी.ए. फर्मने केलेल्या लेखापरीक्षणातून हा सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षाचा तपासणी अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. त्यातून सावळेराम दातीर पतसंस्थेतील अपहार चव्हाट्यावर आला आहे. पतसंस्थेच्या ताळेबंदाप्रमाणे मुदत ठेव खात्यात २ कोटी ३१ लाख ५० हजार रुपये इतकी गुंतवणूक दिसत आहे. पण प्रत्यक्षात बँक बाकी दाखल्याप्रमाणे फक्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. ३१ मार्च २०१६ अखेर बँक बॅलन्स सर्टिफिकेट फरक १ कोटी १ लाख रुपये व ३१ मार्च २०१७ अखेर बँक बॅलन्स सर्टिफिकेट फरक १ कोटी ३० लाख रुपये असा एकूण २ कोटी ३१ लाख रुपयांचा फरक दिसून आला आहे. पतसंस्थेच्या ताळेबंदाप्रमाणे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गणोरे शाखेत पतसंस्थेचे मुदत ठेवीचे खाते आहे. त्यात हा फरक निष्पन्न झाला आहे.जिल्हा बँकेच्या हिवरगाव शाखेत पतसंस्थेचे मुदतठेवीचे दुसरे खाते आहे. ताळेबंदाप्रमाणे मुदत ठेव खाती १ कोटी २२ लाख १६ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात बँक बाकी दाखल्याप्रमाणे गुंतवणूक रक्कम अवघी २ लाख १६ हजार ५०० रुपयेच दिसून आली आहे. या शाखेत ३१ मार्च २०१६ अखेर बँक बॅलन्स सर्टिफिकेट फरक ७० लाख रुपये व ३१ मार्च २०१७ अखेर बँक बॅलन्स सर्टिफिकेट फरक ५० लाख रुपये असा एकूण १ कोटी २० लाख रुपयांचा फरक दिसून आला आहे. पतसंस्थेच्या गणोरे येथील बँक खात्यात २ कोटी ३१ लाख रुपयांचा, तर हिवरगावच्या बँक खात्यात १ कोटी २० लाखांचा अपहार केलेला आहे. अकोले येथील सहायक निबंधक कांतीलाल गायकवाड यांनी या अपहाराच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे.आठ व्यवहारांमध्ये अपहारताळेबंदाप्रमाणे जिल्हा बँकेच्या हिवरगाव शाखेत कॅश सर्टिफिकेट खाती ५४ लाख ८१ हजार ५५१ रुपयांची गुंतवणूक दिसते. प्रत्यक्षात बँक बाकी दाखल्याप्रमाणे कॅश सर्टिफिकेट खाती ६० लाख १६ हजार ४८५ रुपये दिसत आहेत. हा व्यवहार पाहता ५ लाख ३४ हजार ९३४ रुपये इतकी कमी गुंतवणूक या खात्यात दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या अपहार रकमेतून ही रक्कम वजा जाता १ कोटी १४ लाख ६५ हजार ६६ रुपयांचा अपहार केलेला आहे. पतसंस्थेच्या हिवरगाव व गणोरे येथील जिल्हा बँक खात्यातील व्यवहार, इंडियन ओव्हरसिज बँक, सहकारभूषण पंढरीनाथ जिजाबा आंबरे पतसंस्था, सेंट्रल बँक अशा विविध वित्तीय संस्थांमध्ये असलेल्या पतसंस्थेच्या खात्यांमधून ५ कोटी २५ लाख ४५ हजार ८८७ रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याचा स्पष्ट अभिप्राय लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आला आहे.
दातीर पतसंस्थेत सव्वा पाच कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 20:19 IST