देवदैठण : चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यालगत असलेल्या इमारतीत शिरल्याने इमारतीचा चक्काचूर झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील धोकादायक वळणावर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.नगरहून मुंबईच्यादिशेने हा कंटेनर जात होता. गव्हाणेवाडी येथील धोकादायक वळणावर चालकाचा कंटनेरवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सलूनच्या दुकानाचा चक्काचूर करीत कंटेनर थेट राजेंद्र पवार यांच्या इमारतीत घुसला. यावेळी इमारती बाहेर असलेल्या पार्किंगमधील दोन दुचाकींसह चारचाकींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. राहुल पवार यांच्या वाहनांसह तीन गाळ्यांच्या भिंतींना तडे गेले असून पत्रे उचकटले आहेत. यामधे जवळपास दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाजी रिकामे, शशिकांत गव्हाणे, राहुल पवार, दीपक पवार यांनी जखमी चालकास जेसीबीच्या सहाय्याने कंटेनरमधून बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचे नाव समजू शकले नाही. यापूर्वी याच ठिकाणी टँकर इमारतीत घुसून मोठी वित्तहानी झाली होती.मोठी जीवित हानी टळलीरोज सलुनचे दुकान सकाळी ७ वाजता उघडते. येथे ग्राहकांची गर्दी असते. मंगळवारी मात्र दुकान उघडण्यास उशीर झाला. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र कंटेनरने दुकान नेस्तनाबूत केले.
भरधाव कंटेनर इमारतीत घुसला : गव्हाणवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 12:20 IST