अहमदनगर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी अखेरच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी केलेल्या आदेशाच्या फायली जिल्हाधिकाऱ्यांनी मागविल्या आहेत. या वृत्तास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही दुजोरा दिला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मायकलवार हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. अखेरच्या दिवशी मायकलवार यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाच्या अधिकार व कर्तव्याबाबत आदेश जारी केला आहे. यामध्ये उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद समकक्ष असल्याने उपायुक्त कर यांच्या नियंत्रणाखाली असलेले सर्व कामकाज यापुढे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली राहील, असे नमूद करण्यात आले आहे, तसेच उपायुक्तांप्रमाणेच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनाही ५ लाखांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या आदेशाबाबत ज्येष्ठ नागरिक कृतीचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त भोसले यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन भोसले यांनी ३१ डिसेंबर रोजी आयुक्तांनी जे आदेश दिले आहेत, अशा सर्व आदेशाच्या फायली मागविल्या आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्यासह अन्य काही आदेश मायकलवार यांनी जारी केले आहेत.
...
उपायुक्तपदाबाबत संभ्रम
उपायुक्त कर यांच्याकडील सर्व कामकाज यापुढे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली राहील, असा आदेश तत्कालीन आयुक्तांनी जारी केला आहे. उपायुक्त कर पदाचा पदभार सहायक आयुक्त संतोष लांडगे यांच्याकडे होता. हा आदेश निघाल्याने लांडगे हेही मंगळवारी उपायुक्तांच्या दालनात आले नसल्याची चर्चा महापालिकेत होती.