याबाबत पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांनी २० डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली भिंगार) याच्यासह अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील मयत रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे (वय ३५) व त्याच्या पत्नीला २१ फेब्रुवारी २०१७ रोजी जावेद शेख व त्याच्या तीन साथीदारांनी तुम्हाला मेलेली बकरी देतो असे सांगितले. यावेळी आरोपी हे रमेश याला मोटारसायकलवरून काटवनात घेऊन गेले. तेथे रमेश याला दारू पाजवून मारहाण केली. या घटनेनंतर जखमी रमेश याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी तेव्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आस्कमात मृत्यूची नोंद केली होती.
शवविच्छेदन अहवालात मारहाण व पिलेल्या दारूत विषाचे अंश आढळून आले असून याच कारणामुळे मृत्यू झाल्याचे नमूद होते. त्यानंतर चौकशीअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.