अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण आयुक्त यांनी नगर जिल्ह्यात नव्याने १४२२ ठिकाणी आठवीचे तर १८८ ठिकाणी पाचवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी ४८७ ठिकाणी आवश्यकतेनुसार हे वर्ग सुरू झालेले आहेत. या ठिकाणी ३० सप्टेंबरच्या पट संख्या निश्चितीनंतर स्वतंत्र शिक्षक देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने नियम व अटीनुसार पाचवी आणि आठवीच्या वर्गांना मान्यता दिलेली आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले होते. एक किलो मीटर परिसरात पाचवीचा वर्ग आणि तीन किलो मीटर परिसरात आठवीचा वर्ग नाही, अशा ठिकाणी नव्याने या इयत्तेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.तालुकानिहाय वर्ग खोल्यांची संख्या (५ वी, ८ वी एकत्र): अकोले ६३, संगमनेर १००, कोपरगाव ६५, राहाता १०, राहुरी ५, श्रीरामपूर ११, नगर ७, पारनेर २२, श्रीगोंदा ५२, कर्जत १६, जामखेड १४, शेवगाव ४७, पाथर्डी ३४, नेवासा ४१ यांचा समावेश आहे.नव्या सुरू झालेल्या या पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वर्ग खोल्या आहेत. यामुळे बहुतांशी ठिकाणी हा प्रश्न राहणार नाही. मात्र, या ठिकाणी नव्याने शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत थांबावे लागणार आहे.- गुलाब सय्यद, उपशिक्षणाधिकारी.
पाचवी, आठवीसाठी नव्याने ४८७ वर्ग
By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST