पारनेर : २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची परीक्षा दिलेल्या सुमारे बारा हजार विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले असून, नगर जिल्ह्यातील ५७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे़ मागील तीन वर्षे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ होता. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे, यासाठी जिल्हाभर आंदोलने करण्यात आली होती़ दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याची ऐपत नसल्यामुळे शुल्क माफी द्यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर, टाकळी ढोकेश्वरसह अनेक ठिकाणी महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात आला होता़ दुष्काळी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासाठी जिल्हाभर आंदोलने झाली होती़ या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने शुल्क माफीचा निर्णय घेतला होता़ मात्र, तरीही महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले होते़ मात्र, आता दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे नामदेव ठाणगे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
बारा हजार विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
By admin | Updated: July 8, 2014 00:29 IST