कोपरगाव : विदेशीचा त्याग करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला़ त्यानंतर घरोघरी चरखे आले़ त्यापासून बनलेले कापड वापरण्यात येत होते़ ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात गांधीजींनी केली़ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तीच संकल्पना राबवित आहेत़ त्यांची योजना ‘मेक इन कोपरगाव’ हा ग्रामीण भागातील उपक्रम महाराष्ट्रापुढेच नाही तर, देशासमोर चांगले उदाहरण असल्याचे मत केंद्रीय उद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले़ कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित ‘मेक इन कोपरगाव’ या लघुउद्योग मशिनरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ प्रारंभी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़ स्नेहलता कोल्हे होत्या़ पालकमंत्री राम शिंदे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, राजेश परजणे, प्रकाश कवडे, तुलसीदास खुबानी, सुनील चव्हाण, सुधीर डागा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती़प्रारंभी कोपटाऊन अॅग्रो प्रोसेसिंग कंपनीचे उद्घाटन करण्यात आले़ त्यानंतर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कांतीलाल अग्रवाल, दौलतराव चव्हाण यांना तर स्व़ शंकरराव काळे व स्व़ धनराज भनसाळी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गिरीराजसिंह म्हणाले, भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले पाहिजे़ ते ही शेतीशी निगडीत असावेत, जेणेकरून शेती पिकेल व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल़पालकमंत्री राम शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली़ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी उपक्रम राबविण्यामागचा हेतू स्पष्ट केला़ स्वागताध्यक्ष आशुतोष काळे यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी हे प्रदर्शन फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला़ (प्रतिनिधी)तीस लाख बेरोजगारांना नोकऱ्या देणार - सुभाष देसाईतरुणांच्या हाताला काम देण्याचे युती शासनाचे स्वप्न नाही, तर प्रतिज्ञा आहे़ ‘मेक इन महाराष्ट्र’च्या रुपाने ८ लाख कोटी रुपयांचे करार वेगवेगळ्या कंपन्यांनी केले आहेत़ नुसते करार करून आम्ही थांबलो नाही, उद्योग आलेच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले़ १९८ उद्योगांना भूखंडाचे वाटप केले़ उद्योग सुरू झाल्यानंतर तीस लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत़ कोपरगावमध्ये अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर तयार करा, त्याला उद्योग खाते मदत करेल़ लघुउद्योगांसाठी औद्योगिक वसाहतीत भूखंड आरक्षित केले जाणार आहेत़ लघुउद्योगांना भांडवलासाठी दोन कोटीचे व्हेंचर कॅपिटल बँकेत उपलब्ध असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले़
‘मेक इन कोपरगाव’ हे देशापुढील उदाहरण
By admin | Updated: May 8, 2016 00:55 IST