अहमदनगर : एसटी महामंडळाच्या सेवेत आयुष्याची २५-३० वर्षे खर्ची करूनही निवृत्तीनंतरचा आर्थिक मोबदला या कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळत नाही. विशेषत: ग्रॅज्युईटी, तसेच शिल्लक रजेची रक्कम मिळण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
मुळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तटपुंजे वेतन दिले जाते. तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कपात केली जाते. तसेच ग्रॅज्युईटी, शिल्लक रजेचे पैसे अशी एकूण पुंजी कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित असते. परंतु ती देण्यास मोठा विलंब होतो. मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे रजेचे पैसे, तसेच ग्रॅच्युइटीची रक्कम थकीत आहे. पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही, असे सांगितले जाते.
--------------
तुटपुंज्या वेतनात फरपट
एसटी कर्मचाऱ्यांना मुळात अल्प वेतनावर सेवा करावी लागते. त्यामुळे नोकरीत असतानाही आणि निवृत्तीनंतरही त्यांची फरपट होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या हक्काची ही रक्कम सन्मानाने देणे गरजेचे आहे. - सेवानिवृत्त कर्मचारी
----------------
एसटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी महिनाभरात मिळतो. परंतु ग्रॅज्युइटी व रजेचे पैसे अनेक दिवसांपासून मिळालेले नाहीत. एक तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अतिशय कमी असतो. २०-३० वर्षे सेवा करूनही त्यांना सेवानिवृत्ती वेतन केवळ २ ते ३ हजार रुपये मिळते. सर्वात आधी म्हातारपणाची ही काठी सेवानिवृत्ती रक्कम वाढवणे गरजेचे आहे.
- शिवाजीराव कडूस, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
---------------
एसटी कर्मचारी प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे महामंडळासाठी सेवा बजावतो. परंतु निवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळण्यासाठी चकरा माराव्या लागतात, ही दुर्दैवी बाब आहे. सेवेत असताना वैद्यकीय बिले, मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि निवृत्तीनंतर रजेची रक्कम किंवा इतर पैशासाठी वर्षानुवर्षे विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. हे चित्र बदलले पाहिजे.
- डी. जी. अकोलकर, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना
----------------
एकूण आगार - ११
अधिकारी -२१५
बसचालक - १,२६७ वाहक - १,३०८