राहुरी स्टेशन : अल्पसंख्यांक समाजातील मुले व मुली शैक्षणिक प्रवाहात सक्रीय होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या अल्पसंख्यांक व इतर शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्ट व महाडेबिट या वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी हेळसांड होत आहे.
ही वेबसाईट सेवा सुरळीत करण्याची मागणी जमाअते इस्लामिकच्या राहुरी शाखेने केली आहे.राज्य सरकारच्या महाडेबिट या वेबसाईटवर शेतकरी कर्जमाफी, आधार अपडेट व शिष्यवृत्ती या सर्व प्रक्रिया होत असल्याने वेबसाईटवर मोठा भार येऊन गोंधळ होत आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी बँक खाते व त्याला आधार लिंक करणे, आधारला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी व इतर अनेक कागदपत्रे जमा करताना होणाºया धावपळीनंतर अर्ज भरण्यासाठी साईटच ओपन होत नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत.वेबसाईटच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास साईट अपडेटचे काम सुरू असल्याचे नेहमीप्रमाणे समोरून उत्तर देऊन बोळवण केली जात आहे. केंद्राच्या एन. एस. पी. साईटवर पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अनेक महाविद्यालयांची नावेच नसल्याने व अर्ज भरण्याची मुदत संपल्याने नाईलाजाने राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे लागत आहेत. ती साईटही सुरळीत चालत नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.