श्रीगोंदा : एकास एक उमेदवार देऊन यंदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याची रणनिती आखणारे मतदारसंघातील काँग्रेसचे विविध गट प्रत्यक्ष घोडामैदान जवळ येण्यापूर्वीच दुभंगले आहेत. कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी अपक्ष दंड थोपटताच शिवाजीराव नागवडे गटानेही सरसावत सबुरीचा सल्ला दिला खरा, पण तो अव्हेरत जगताप पुढे निघाले आहेत.६ वेळा विधानसभा जिंकत आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघातील काँग्रेस खिळखिळी केली. मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांना सातत्याने पाचपुतेंशी संघर्ष करावा लागला. पाचपुते विरोधक एकत्र आल्याशिवाय टिकाव लागणार नाही, याची पूर्ण कल्पना त्यांच्या विरोधकांना आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजीराव नागवडे, कुंडलीकराव जगताप, बाळासाहेब नहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा.तुकाराम दरेकर आदींनी पाचपुते विरोधात एकास एक उमेदवार देण्याची शपथ घेतली होती. मात्र दोन-अडीच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अर्धालाख मतांची आघाडी मिळाल्याने अनेकांना पाचपुतेंचा पराभव दिसू लागला. अनेकांच्या महत्वाकांक्षा पुन्हा जाग्या झाल्या. त्यात ‘एकास एक’ ही शपथही विरली. कुकडी कारखान्याचे अध्यक्ष आणि कुंडलीकराव जगताप यांचे चिरंजीव राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा करुन ‘एकास एक’ हा विषय काँग्रेसला थंडबस्त्यात टाकण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्र्यंत परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा हालचाली सुरु केल्या आहे. अद्यापही या गोटात एकास एक विषय जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवार निवडीचे अधिकार मिळाल्यानंतर नागवडे यांनी हा चेंडू बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या कोर्टात टाकला आहे. मात्र जगताप परत फिरतील, ही शक्यता त्यांनी प्रत्यक्ष प्रचार सुरु केल्याने मावळली आहे. राष्ट्रवादी सोडून अपक्ष उमेदवारीसाठी सरसावलेले घनश्याम शेलार यांच्यामुळे आजच सामना पाचपुते-जगताप-शेलार असा तिरंगी झाला आहे. महायुतीकडून ही जागा भाजपाच्या वाट्याला आहे. जगताप यांच्यासह राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, सेनेकडून प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून बाळासाहेब नाहाटा अशी इच्छुकांची यादी लांबली आहे. त्यामुळे आगामी काळात श्रीगोंद्याचे रण तीव्र होण्याची शक्यता आहे.
‘एकास एक’चे समीकरण हवेत विरले!
By admin | Updated: July 16, 2014 00:44 IST