महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची व उपलब्ध विविध सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा योग्य वापर करून, स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. कोरोनाच्या काळातही उत्कृष्ट शिक्षण दिले गेले. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ऑनलाइन पध्दतीने वर्ग आजही सुरू आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध सहाय्य योजना व वसतिगृह सुविधा महाविद्यालय उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांनी कोरोना हे संकट म्हणून न पाहता एक संधी म्हणून पहावे. असे डॉ. गायकवाड म्हणाले.
विभाग प्रमुख प्रा. ललिता मालुसरे यांनी विभागाची माहिती व अंतर्गत गुणदान पध्दती, विद्यार्थी विकासाच्या विविध विकास योजना यांची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम खेळ, वाणिज्य महोत्सव, कमवा आणि शिका आदी योजनांची तसेच संशोधनात्मक स्पर्धा, आविष्कार व एम.काॅम. संशोधन प्रकल्पाची माहिती तसेच सीएमए प्रा. संदीप वडघुले यांनी सीए, आयसी डब्लूए, सी.एस कोर्सची माहिती दिली.
विविध शिष्यवृत्ती योजना विषयी कार्यालयीन माहिती स्काॅलरशीप प्रमुख विजय पाटील यांनी दिली. प्रा. एल.बी. मालुसरे यांनी नैतिक मूल्ये कशी जपावी व स्वतःचे एक चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण व्हावे, यासाठी सततत प्रयत्नशील राहावे, अशी सूचना मांडली. शेवटच्या सत्रात वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी एक मुक्त संवाद साधला. त्यात विद्यार्थ्यांनी विविध मते मांडली. प्रास्ताविक प्रा. हेमलता तारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सारिका पेरणे यांनी केले. प्रा. मालुसरे यांनी आभार मानले.