निरक्षर हंगेवाडीतील प्राथमिक शाळा ‘लय भारी’
By admin | Updated: April 26, 2017 20:07 IST
ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेत लक्ष घातले आणि शाळा डिजिटल केली आणि शाळेत क्रीडा संगणक, इतर सुविधा लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिल्या.
निरक्षर हंगेवाडीतील प्राथमिक शाळा ‘लय भारी’
श्रीगोंदा : तालुक्यातील हंगा नदीच्या काठावरील हंगेवाडी हे साक्षरतेचे प्रमाण कमी असलेले गाव, पण भविष्यात गाव आणि गावातील तरूण मुले शिक्षणातून समृद्ध करण्यासाठी शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेत लक्ष घातले आणि शाळा डिजिटल केली आणि शाळेत क्रीडा संगणक, इतर सुविधा लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिल्या. मोडकळीस आलेल्या शाळेचे मंदिर झाले. आणि या मंदिरातील मुले विविध गरूड झेप घेऊ लागले आहेत. हंगेवाडीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा १९४१ साली सुरू झाली. सुरूवातीला पहिली ते सातवीत अवघे सोळा विद्यार्थी. शाळेचे नाव काढले तरी हंगेवाडीकर जवळ येत नव्हते. शाळेची १९५६ साली बांधलेली जुनी इमारत मोडकळीस आलेली होती. शिक्षकांनी शाळेची दुरावस्था ग्रामस्थांसमोर मांडली आणि ग्रामस्थांनी सर्व शिक्षा अभियानातून शाळेसाठी दोन मजली इमारत बांधून घेतली आणि शाळेची घोडदौड सुरू झाली. शाळेचा अंतर व बाह्य रंग बदलण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे पाच लाखाची लोकवर्गणी जमा केली. शाळेची रंगरंगोटी, पाणी शुद्धीकरण यंत्र, क्रीडांगण निर्मिती, क्रीडांंगणावर विविध आकर्षक खेळण्या, वृक्षारोपण, रंगमंच निर्मिती अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या. भौतिक सुुविधांबरोबरच मुलांचा बौद्धीक विकास होण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवले. पुण्याच्या रोटरी क्लबने ओव्हरहेड प्रोजेक्टर मुलांसाठी संगणक कक्ष सुरू केला. गेल्या महिन्यात शाळेने लोकसहभागतून ३२ इंची १० एल .ई.डी. टी व्ही संच मिळवले व संपूर्ण शाळा डिजिटल केली. तसेच सुसज्ज प्रयोगशाळा , ग्रंथालय तयार केल. शाळेन ेराबवलेल्या विविध उपक्रमांची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतली आणि हंगेवाडीची शाळा ‘लयभारी’ असा अभिप्राय नोंदविला आहे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या इस्रो सहलीसाठी शाळेच्या पूजा बारवकर (इ .७ वी) व हर्षद जगताप (इ .६ वी) या दोन विद्यार्थ्यांची निवड इस्रो सहलीसाठी होऊन ते थुम्बा (केरळ ) येथे विमान प्रवासाने भेट देवून आले. धनश्री वाळूंज विद्यार्थिनीची जवाहर नवोदयसाठी निवड झाली. तालुकापातळी विविध स्पर्धेत ११ बक्षिसे व जिल्हा पातळी स्पर्धेत एका विद्यार्थ्यांने यश मिळवून शाळेचा झेंडा रोवला आहे .