अहमदनगर : कायदे कितीही सक्षम असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. घराबाहेर गेेलेली एकटी महिला सुरक्षित नाही, तशी घरात थांबणारी महिलाही सुरक्षित नाही. कारण अनेक घटनांमध्ये घरातील अथवा जवळच्या व्यक्तींनीच महिला, अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेची शिकार बनविल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या १२७, विनयभंग ३१३ तर अपहरणाच्या १८४ घटना समोर आल्या आहेत.
बलात्काराच्या १२७ पैकी तब्बल ६५ घटना अल्पवयीन मुलींबाबत घडल्या आहेत. यातील बहुतांशी घटनांमध्ये ओळखीचा व्यक्ती, घरातील नातेवाईक, अथवा लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनकाळातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. मैत्री झाल्यानंतर संधी साधून अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करूनही तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकार नगर शहरात समोर आले आहेत.
-------------------------
प्रेमाचे आमिष दाखवून मुलींना ओढतात जाळ्यात
अल्पवयीन मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून नराधम त्यांना जाळ्यात ओढतात. मुलींच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करतात तर कधी पळवून घेऊन जातात. अशा घटनांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अशा मुलींना शोधून आरोपींवर कारवाई करतात. बहुतांशी प्रकरणात घरातून निघून गेलेल्या मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत मिळून आल्या आहेत.
----------------------------
मैत्री, प्रेम अन् घात
कॉलेजमधील ओळख अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येतात. प्रथम मैत्री होते. याच मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर होते. अशा प्रेमप्रकरणांतूनच बहुतांशी मुलींचा घात होतो. समोरील व्यक्तीवर तरुणी पूर्णत: विश्वास ठेवून तो म्हणेल तेथे जाते. अशा ठिकाणी जबरदस्ती, अश्लिल व्हिडिओ तयार करणे आदी प्रकार होतात.
--------------------
मागील आठ महिन्यांत घडलेल्या घटना
बलात्कार- १२७
विनयभंग-३१३
अपहरण-१८४