कोपरगाव : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता कोरोनाने आता कोपरगाव सबजेलमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. या सबजेलमध्ये कोपरगाव शहर व तालुका, शिर्डी, लोणी, राहाता अशा पाच पोलीस ठाण्यांचे गुन्ह्यातील आरोपी कैदेत ठेवले जातात. मंगळवारी (दि. ६) येथील आठ कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
यामध्ये शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील एक तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील सात अशा आठ कैद्यांचा अहवाल बाधित आला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सबजेलचे प्रभारी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग यांनी दिली.
दरम्यान, कोपरगाव सबजेलची २१ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सद्य:स्थितीत तेथे ८० कैद्यांना ठेवण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कैद्यांची संख्या ही चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन सबजेलमधील कैद्यांची संख्या कमी करण्याची गरज आहे.