अहमदनगर : समाज रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस दलात लाचेचा व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल बारा पोलीस अधिकारी, कर्मचारी लाच घेताना चतुर्भुज झाले आहेत. यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
तक्रारदारांकडून अगदी शुल्लक कामांसाठी १ हजारापासून ते ५० हजार रुपयांपर्यंत पोलिसांनी लाच स्वीकारल्याचे प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी तर कधी अवैध व्यावसायिकांकडून पोलिसांनी लाच स्वीकारल्याचे प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांची लाच देण्याची तयारी नव्हती. त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याने कारवाई झाली. मात्र बहुतांशी जण तक्रार करत नसल्याने लाचखोर पोलिसांचे चांगलेच फावते. जिल्ह्यात लाच स्वीकारण्यात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रथम व तर पोलीस दल द्वितीय स्थानी येते. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पारदर्शी कामकाजावर भर देत पोलीस दलात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. टू-प्लस योजनेंतर्गत सराईत गुन्हेगारांची कुंडली तयारी केली आहे. तसेच संघटित गुन्हे करणाऱ्यावर मोक्का, हद्दपारी अशा धडक कारवाई सुरू आहेत. काही लाचखोर पोलीस मात्र लाच स्वीकारून पोलीस दलाची प्रतिमा डागाळत आहेत.
--------------------------
एकाच वेळी तीन पोलिसांवर कारवाई शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर लाच मागितल्या प्रकरणी ७ एप्रिल रोजी एकाच वेळी कारवाई झाली. या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूकदारांचा ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी हप्ता म्हणून पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. एकाच वेळी तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला होता.
--------------------------
लाच मागितली जात असेल, तर येथे संपर्क साधा
कोणताही लोकसेवक सर्वसामान्य जनतेला त्यांचे काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.