अहमदनगर: एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास पथकाच्या सदस्यांना कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले़एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास पथकातील कामगारांना कायम करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आली़ मात्र कामगारांच्या मागणीची शासनाकडून दखल घेण्यात आली नाही़ त्यामुळे संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे, की या विभागात कार्यरत असलेल्या कृषितज्ज्ञ उपजिविका तज्ज्ञ, समुदाय संघटक यांची पूर्वसेवा आणि गरज लक्षात घेता त्यांना सेवेत कायम करणे क्रमप्राप्त आहे़ याविषयी वेळोवेळी मागणी करण्यात आली़ मात्र दखल घेतली जात नाही़ सेवा ज्येष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करावी़ कर्मचाऱ्यांना तातडीने किमान २५ हजार वेतन सुरू करावे,अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ निवेदनावर कार्याध्यक्ष ए़ एम़ देशमुख, जिल्हा सरचिटणीस एस़ व्ही़ मिरपगार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
पाणलोट विकास पथकाचे धरणे
By admin | Updated: July 15, 2014 00:46 IST