श्रीगोंदा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतिगृह शुक्रवारपासून (दि.२) कोविड हेल्थ केअर सेंटरसाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे. या संदर्भात गुरुवारी तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाल बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, प्रा. तुकाराम दरेकर, स्मितल वाबळे, अनिल ठवाळ, सुनील ओव्हळ, अमर घोडके, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले आदी उपस्थित होते.
अनिल ठवाळ यांनी मुलींचे वसतीगृह हे दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने ताब्यात घेऊ नये. मागील वेळी कोविड सेंटरसाठी मुलींचे वसतिगृह अधिग्रहण केले होते. त्यावेळी वसतिगृहाचे मोठे नुकसान झाले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर स्वाती दाभाडे म्हणाल्या, आता सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. या वसतिगृहातील सर्व मुलींना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविल्या जातील.
त्यानंतर स्वाती दाभाडे इतर अधिकारी पदाधिकारी यांनी दोन्ही वसतिगृहाची पाहणी केली. त्यांनी वसतिगृह अधीक्षक कुरेशी व मुलींशी चर्चा केली.
--
मुलींची नेमकी संख्या किती?
तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३५ मुली आहेत, अशी माहिती वसतीगृह अधीक्षकांनी दिली. मात्र वसतिगृहाचे हजेरी रजिस्टर उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी तपासले. तेथे १७ मुली हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे नेमक्या मुली किती हा प्रश्न उपस्थित झाला आहे.