वाळकी : सद्यस्थितीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजातील एकमेकांनी एकमेकांशी नाते जोडणे अवघड झाले आहे. त्यामुळे विवाहाच्या माध्यमातून कुटुंबे जोडण्यासाठीही सहजासहजी कोणी पुढे येत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर दोन अधिकाऱ्यांनी कुटुंब जोडण्याचा ध्यास घेतला. वयाची साठी पूर्ण झाली असली तरी दोघेही विनामोेबदला वधू -वर सूचक मंडळ व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी येथील प्रा. रमाकांत बोठे व यशवंत निघुते या दोघांनी जवळपास ४०० कुटुंबे एकमेकांना जोडली आहेत.
प्रा. रमाकांत बोठे यांनी लोणी येथे ३५ वर्षे नोकरी केली तर यशवंत निघुते यांनी पाटबंधारे खात्यात लिपिक म्हणून ३४ वर्षे नोकरी केली. समाजातील दरी दूर करण्यासाठी या दोघांनी व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुटुंब जोडण्याचे काम सुरू केले आहे.
अनेक समाजात योग्य विवाहस्थळ मिळत नसल्याने तरुण-तरुणींचे विवाह रखडल्याची उदाहरणे आहेत. या प्रश्नाची जाणीव ठेवून बोठे, निघुते यांनी समाजातील विवाह जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्याकडे बायोडाटा आल्यानंतर वधू-वरांच्या पालकांना ते संपर्क करतात. अपेक्षा विचारतात. परिसरातील त्यांच्या पाहण्यातील वर किंवा वधू ते शोधतात. त्यानंतर वधू-वराच्या पालकांशी संपर्क करून पुढील जबाबदारी पार पाडतात. आतापर्यंत मध्यस्थाशिवाय २०० हून अधिक विवाह व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले आहेत. या ग्रुपमध्ये नियमावली केली आहे. नियम सुरुवातीला सांगितले जातात. त्यानंतरच ग्रुपमध्ये घेतले जाते. दोघांचेही ग्रुपवर बारकाईने लक्ष असते. हे कार्य ते विनामूल्य करत आहेत.
...............
सध्या दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत आहे. त्याचा परिणाम सर्वच जाती -धर्मातील मुलांच्या लग्नावर झाला आहे. काही समाजात तर मुली मिळत नसल्याने आंतरजातीय लग्नाशिवाय पर्याय उरलेला नाही. काही समाज अजूनही रूढी, परंपरेला चिकटून बसलेला आहे. आपल्याला हवे तसेच स्थळ मिळावे, अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. दोन्ही बाजूच्या अनेक अपेक्षा असतात. त्यामध्ये कुठेतरी जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे आम्ही विवाहाच्या माध्यमातून कुटुंब जोडत आहोत.
- प्रा. रमाकांत बोठे, यशवंत निघुते
फोटो आहेत