राशीन (जि. अहमदनगर) : दोन मुले, पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत तालुक्यातील राशीन येथे उघड झाला. सकाळी बराच वेळ होऊनही डॉक्टरांसह कुटुंबीयांनी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारी व मित्रांनी दरवाजा तोडल्याने हा प्रकार समोर आला. त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्येचे कारण लिहिले आहे.
डॉ. महेंद्र जालिंदर थोरात (वय ४६), पत्नी वर्षा (४२), मुलगा कृष्णा (१७), कैवल्य (७) अशी मृतांची नावे आहेत.
राशीन येथे डॉ. महेंद्र थोरात (बीएचएमएस) यांचे श्रीराम हॉस्पिटल आहे. ते गेल्या १४ वर्षांपासून या माध्यमातून रुग्णसेवा करीत होते. शुक्रवारी ते रात्रीपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डॉ. थोरात यांनी रात्रीच दाेन मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन दिले व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी नऊ वाजले तरी डॉ. थोरात यांच्या घराचा दरवाजा उघडलेला दिसला नाही. त्यामुळे शेजारी राहणारे लोक व मित्रांनी दरवाजा तोडला. घरात डॉ. थाेरात यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलीसही तत्काळ घटनास्थळी आले. डॉ. थोरात यांनी गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला डायरीच्या कागदावर थोरात यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली. मृत चौघांची उत्तरीय तपासणी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.
..............................
कृष्णाचे दु:ख आम्हाला सहन होत नाही..
डॉ. थोरात यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण दिले आहे. आमचा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी (कर्णबधिर) येत होते. त्यामुळे आम्हाला समाजात अपराध्यासासारखे व सतत अपमानास्पद वाटत असे. यामुळे अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित होतो. कृष्णाचेही कशातच मन लागत नव्हते. समाधान वाटत नव्हते; पण हे तो बोलून दाखवत नव्हता. त्याचे हे दु:ख आम्ही वडील, आई म्हणून सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे मी व माझी पत्नी वर्षा चर्चा करून विचाराने हे आत्महत्येसारखे कृत्य करीत आहोत. या कृत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. हे कृत्य आम्हास योग्य वाटत नसले तरी नाइलाजावास्तव हे कृत्य करीत आहाेत. कृपया आम्हांला माफ करावे. संपत्तीतील वाटा कर्णबधिर मुलांच्या संस्थेस द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
----
२० महेंद्र थोरात न्यू