अहमदनगर : हुंडा देणे-घेणे कायद्याने गुन्हा असला तरी लग्न जमविताना दोन्ही बाजूकडील नातेवाईकांची पहिली बैठक ‘देणे-घेणे’ या विषयावरच असते. हुुंड्यात रोख रकमेसह दागिने, घरगुती वस्तू, वाहन, फ्लॅट अशा विविध स्वरुपांची मागणी केली जाते. मुला-मुलीची इच्छा असो अथवा नसो, हुंडा घेतलाही जातो आणि दिला जातो. हुुंड्यावर मुलांच्या आधी त्यांचे आई-वडीलच हक्क सांगतात. पुढे याच हुंड्यावरून सासरी विवाहितांचा छळ होतो.
मुला-मुलीचे वय झाले की, माता-पिता लग्नासाठी स्थळ पाहतात. मुलीसाठी मुलगा नोकरीवाला, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असावी, अशी अपेक्षा असते. मुलीच्या आयुष्याचे कल्याण व्हावे, या उद्देशातून आई-वडील वरपक्षाचे नातेवाईक मागेल ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वरपक्षाकडूनही लग्नात जे काही पदरात पाडून घेता येईल तेवढे घेतात. इतके सारे काही देऊनही बहुतांशी मुलींना सासरी शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागतो. सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत अथवा कोणताही समाज असो, कोणत्याही तरी स्वरुपात हुंड्याची प्रथम आजही कायम आहे.
................
हुंडाविरोधी कायदा काय?
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ रोजी करण्यात आला आहे. त्यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. हुंडा म्हणजे लग्नात मुलीला दिलेले सर्व वस्तू, चीजवस्तू, कपडे, रोख पैसे, सोने इत्यादी. यासंदर्भात तक्रार केली तर पोलिसांकडून हुंडा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.
-------------------------
जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी
लग्नात अपेक्षित हुंडा दिला नाही तसेच माहेरून पैसे आणावेत आदी कारणांसाठी सासरी महिलांचा छळ केल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कलम ४९८ अंतर्गत ३२६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. हुुंडाबळीच्या १३ तक्रारी दाखल आहेत.
--------------
हुंडा ही रूढी-परंपरेने चालत आलेली चुकीची पद्धत आहे. ही प्रथा बंद होणे गरजेचे आहे. यासाठी लग्न करताने मुलांनी हुंडा घेऊन नये तर जो मुलगा हुंडा मागेल त्याला आई-वडिलांनी त्यांची मुलगी देऊ नये.
- सहदेव बोरुडे, तरुण
-------------------
समाजात हुंड्याची प्रथा प्रचलित असल्याने मुलीचे लग्न करताना आई-वडिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. हुंडा दिला नाही तर मुलीला सासरी त्रास होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे इच्छा नसतानाही हुंडा द्यावा लागतो. हुंडा देणार नाही आणि घेणार नाही असा निश्चय नवीन पिढीने केला तर ही पद्धत बंद होईल.
-वैशाली आहेर, तरुणी
------------------------