तिसगाव : मी खूप थकलो आहे़ मी हरलो आहे़ माझ्या कुटुंबीयांशी बोलण्याचे धैर्य होत नाही़ मी आता खूप दूर चाललो आहे. नोकरी कोणतीही असावी परंतु तलाठ्याची नसावी, अशा आशयाची चिठ्ठी बेपत्ता तलाठी सचिन लोहकरे यांच्या दुचाकीच्या डिक्कीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ लोहकरे हे माणिकदौंडी (ता़पाथर्डी) येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत़याबाबत सविस्तर असे की, २८ जून रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर लोहकरे परत घरी आलेच नाहीत़ त्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्र व नातेवाईकांनी लोहकरे यांचा शोध घेतला़ आठ दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये त्यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत म्हटले आहे की, मला फार त्रास होतोय़ मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी आता खूप दूर चाललोय़ नोकरी कोणतीही असावी परंतु तलाठ्याची नसावी़ मला शांती मिळेल अशा ठिकाणी मी जाणार आहे, अशी चिठ्ठी लोहकरे यांनी लिहून ठेवली आहे़ लोहकरे यांच्या चिठ्ठीने महसूल प्रशासनात आणि परिसरात खळबळ उडाली आहे़ शेतकरी, राजकारणी व महसूल विभागाच्या कोंडीत सापडल्यामुळेच लोहकरे यांना नैराश्य आले असावे, अशी चर्चा परिसरात होत आहे़ या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तलाठ्यांमधून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.(वार्ताहर)तलाठ्यांचा इशारा तालुका तलाठी संघाने ७ जुलै २०१४ पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत बेपत्ता तलाठी लोहकरे यांचा शोध घ्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, संतोष लोहकरे यांनीही पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल करुन बेपत्ता भावाचा शोध लावावा, असा आग्रह धरला आहे.
नोकरी करा, पण तलाठ्याची नको
By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST