अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा जिल्ह्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत निम्माही पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनसाठी जिल्हाभर ओढाताण सुरू आहे. जिल्ह्यासाठी प्रशासनाकडून ५० टन ऑक्सिजनची मागणी नोंदविण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्याला केवळ २२ टन ऑक्सिजन मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो. शासनाने रुग्णांची आकडेवारी विचारात घेऊन अहमदनगर जिल्ह्यासाठी २६ टन इतका ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला आहे. असे असले तरी नगर जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी ५० टन इतकी आहे. मागणीच्या तुलनेत निम्माही पुरवठा होऊ शकत नाही. जो ऑक्सिजन मिळतो, तोही वेळेवर मिळत नाही. गुरुवारी पुणे येथून पोलीस संरक्षणात एक टँकर आणण्यात आला होता. तो खासगी रुग्णालयांना दिला गेला. परंतु, खासगी रुग्णालयांची मागणी ३५ टन इतकी आहे. त्यात तुलनेत त्यांना कमी ऑक्सिजनचा पुरवठा झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या आमी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे आणखी ऑक्सिजनची मागणी केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी शुक्रवारी आलेल्या १२ टनांपैकी २ दोन खासगी रुग्णालयांना देण्यात आला आहे. ऑक्सिजन कमी पडू लागल्याने अनेक रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ऑक्सिजनच्या बेडसाठी रुग्णालयांची पायपीट करावी लागत आहे.
....
ऑक्सिजनचाही काळाबाजार
कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत निम्माही पुरवठा होत नाही. औद्योगिक क्षेत्रासाठी पुरविण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठाही गोठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा काळाबाजार होत असल्याबाबत उद्योजकांमधूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याचवेळी इंडियन मेडिकल असोसिएशननेही ऑक्सिजनचा काळाबाजार थांबविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे शुक्रवारी केली आहे.
....
सात महिन्यांत दुसऱ्यांदा तुटवडा
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी डॉक्टरांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी केली होती. परंतु, गेल्या सात महिन्यांत प्रशासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
....
जिल्ह्यातून दररोज ५० ते ६० मेट्रिक टन ऑक्सिजची मागणी होत आहे. परंतु, त्या तुलनेत कमी पुरवठा होताे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी
....
नगर शहरातील खासगी रुग्णालयांत दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. वेळोवेळी मागणी करूनही जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुवठा होत नाही. केवळ जिल्हा रुग्णालयालाच ऑक्सिजन पुरविला जात असल्याने खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
-डॉ. सचिन वहाडणे, सचिव, आयएमए
....
साहेब... माझ्या पतीला वाचावा
जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद
येथील व्हीआरडीईतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पत्नीने ऑक्सिजनसाठी शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत साहेब माझ्या पतीला वाचावा, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यांनी आयुष्यभर देशसेवा केली. कोरोनाची लागणी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बेडसाठी फिरते आहे. परंतु, बेड मिळाला नाही. एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे ऑक्सिजनची सुविधा नाही, असे सांगत या महिलेने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व ऑक्सिजनची मागणी केली.