लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या कामासह अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त करत प्रभाग समितीनिहाय नियोजन करून अतिक्रमणे हटाव मोहीम हाती घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिला. तसेच पुढील महिन्यात काय काम करणार, याचा अहवाल विभागप्रमुखांकडून मागविला आहे.
जिल्हाधिकारी तथा आयुक्त भोसले यांनी बुधवारी महापालिकेतील विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, दिनेश सिनारे, सहायक आयुक्त सचिन राऊत, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, वित्त व लेखा अधिकारी प्रवीण मानकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीष राजूरकर उपस्थित होते. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरची जिल्हाधिकारी भोसले यांची महापालिकेतील ही पहिलीच बैठक होती. पहिल्याच बैठकीत भोसले यांनी प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेतला. शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्ते खोदून ठेवले; पण योजनेचे काम गजगतीने सुरू आहे. या कामाबाबत भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून आठ दिवसांत अतिक्रमणे हाटविण्याचा आदेश भोसले यांनी अतिक्रमण विभागाला दिला आहे.
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. महानगरपालिकेचा कोट्यवधींचा कर थकलेला आहे. ही वसुली करण्यासाठी योग्य नियाजन करा तसेच वेळप्रसंगी कठाेर भूमिका घेऊन विशेष वसुली मोहीम राबविण्याचा आदेश भोसले यांनी दिला. याशिवाय शहरातील दैनंदिन स्वच्छता, आरोग्य सेवा, दिवाबत्ती, घनकचरा संकलन, अंत्यविधी, यासारख्या सुविधांमध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही, याची काळजी घ्या. शहरातील मोकाट कुत्रे व जनावरे पकडण्याचे काय नियोजन केले आहे, याचीही भोसले यांनी माहिती घेतली.
....
भोसले यांच्या आदेशाने विभागप्रमुखांची धावपळ
महापालिकेतील विभाग प्रमुखांना यापूर्वीच्या माहितीसह पुढील महिनाभरात काय काम करणार, याचा अहवाल आयुक्त भाेसले यांनी मागविला आहे. हा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचा आदेश भाेसले यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यांच्या कामाचे काय नियोजन करायचे, असा प्रश्न विभागप्रमुखांसमोर आहे. तातडीने अहवाल सादर करणे आवश्यक असल्याने विभागप्रमुखांची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
..
सूचना फोटो आहे.