भिंगार : केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याने भिंगार छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) एक वर्षासाठी बरखास्त केले आहे. बुधवारी रात्री संरक्षण खात्याने भिंगार छावणी मंडळ बरखास्त करण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे. याची कार्यवाही तातडीने करण्यात आली असून मंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला आहे. भिंगारच्या छावणी मंडळाची गतवर्षीच मुदत संपली होती. मंडळाच्या सदस्यांना दोनवेळा मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे सदस्यांना एक वर्षाने कार्यकाळ वाढून मिळाला होता. ही वाढीव कार्यकाळाची मुदत ५ जूनला संपुष्टात आली आहे. याबाबत छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी ही माहिती दिली. १८ मे २००८ मध्ये पहिल्यांदाच पक्षाचा चिन्हावर सात प्रभागात निवडणूक लढविण्यात आली होती. काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर अपक्ष एक असे सात सदस्य होते. काँग्रेसने अपक्ष शेख शाहीन यांच्यासोबत युती करत सत्ता काबिज केली होती. उपाध्यक्ष पद कलीम शेख यांनी मिळवले होते. शेख कलिम, सुनील उर्फ बाळासाहेब पतके, विजय भिंगारदिवे, श्रीमती शेख शाहीन, स्मिता अष्टेकर ( कुंभारे ), विष्णू घुले , प्रकाश फुलारी छावणी परिषदेवर निवडून गेले होते. पाच लष्करी अधिकारी हे मंडळाचे पदसिद्ध सदस्य होते. या सर्व १२ सदस्यांचा छावणी मंडळातर्फे सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. मंडळाच्या सभेत दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा अस्तित्वात आल्यावर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तो पर्यंत पुन्हा मुदतवाढ मिळते की एक सदस्य समिती अस्तित्वात येते,या बद्दल नागरिकांतील उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान छावणी मंडळाचा कार्यभार ब्रिगेडिअर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पाहणार आहेत.एकूण सदस्य १४निवडून गेलेले सात सदस्य, लष्करातील पदसिद्ध पाच सदस्य, ब्रिगेडिअर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे एकूण १४ सदस्यांचे छावणी मंडळ आहे. यातील बारा सदस्यांना निरोप देण्यात आला. दोन सदस्य छावणी मंडळाचा कारभार पाहणार आहेत. एक वर्षासाठी मंडळ बरखास्त करण्यात आल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकानंतरच भिंगार छावणी मंडळाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
भिंगार छावणी मंडळ बरखास्त
By admin | Updated: June 6, 2014 00:59 IST