पारनेर : ४० पर्यटन स्थळे शोधून त्याचा प्रसार करणे, किल्ले भ्रमंती करून तेथे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान राबविणे, पारनेर तालुक्यातील डोंगरावर दहा ते पंधरा हजार बियांचे रोपण करणे, पथनाट्यातून कोरोनाबाबत जनजागृती करणे, अशी सामाजिक बांधिलकी कामांसाठी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील ध्येयवादी तरुण प्रा. तुषार ठुबे धडपड करतोय.
कान्हूर पठार येथील प्रा. तुषार ठुबे हा एका सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहे. तो वेगवेगळ्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना पारनेर तालुका कवी मंचच्या वतीने तालुक्यात प्रथम पारनेर तालुका काव्य महोत्सव सुरू केला. लॉकडाऊनमध्ये ‘आडवाटेचं पारनेर’च्या माध्यमातून रूईचोंडदरा, विरोलीच्या लेण्यासह पारनेर तालुक्यातील ३५ ते ४० पर्यटन केंद्र शोधून काढली आणि तिचा प्रसार केला. ती पर्यटन स्थळे जगाच्या नकाशावर आली.
कोरोना काळात संकेत ठाणगे, ओमप्रकाश देडगे, श्रद्धा ढवण, माधुरी चत्तर, महाबली मिसाळ, प्रमोद चेमटे, शाहीर दत्तोबा जाधव, दत्तात्रय श्रीमंदिलकर, समाधान रनशूर, अशोक गायकवाड, आरती बेलोटे, सोमनाथ चौधरी, शुभम फंड, विनोद ठुबे, रोहित वाघमारे, मोहन माने, ऋषिकेश माने, काशिनाथ सूर्यवंशी यांना बरोबर घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी गावोगावी पथनाट्य करून जनजागृती केली.
---
किल्ले, डोंगरावर बीजारोपण, वृक्षारोपण
प्रा. तुषार ठुबे यांनी डोंगर, किल्ले हिरवेगार करण्याचा ध्यास घेतला. सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमोद खामकर, हरी व्यवहारे, सचिन गायखे, आरती लोंढे, अश्विनी काकडे, प्रियंका वाघमारे यांच्यासह युवक, युवतींना बरोबर घेऊन किल्ले जीवधनवर श्रमदान करून किल्ले दुरुस्ती मोहीम राबविली. आता बियाणे बँक तयार करून फळांसह वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या १५ ते २० हजार बियांचे बीजारोपण केले.
---
०९ पारनेर