शेवगाव : अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करताना दिव्यांगांसाठी केवळ एक ॲपची निर्मिती सोडता कोणत्याही प्रकारची भरीव तरतूद केली नसून एक प्रकारे दिव्यांगांना वंचित ठेवल्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकारने केला आहे. याचा निषेध नोंदवत सावली दिव्यांग संस्थेने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निषेधाचे पत्र दिले आहे.
राज्यातील २०११ च्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या अंदाजे ४० लाखांच्या आसपास आहे. दिव्यांग हे समाजामध्ये वंचित घटक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासाठी राज्य शासनाने भरीव तरतूद करणे अपेक्षित होते. राज्य सरकारने दिव्यांगांच्या रोजगाराच्या दृष्टीने उपाययोजना करणे, राज्यात दिव्यांग वित्त महामंडळ, बीजभांडवल असे अनेक प्रस्ताव निधीअभावी धूळखात आहेत. किमान व्यवसायासाठी तरी तरतूद करणे आवश्यक होते. परंतु, सादर झालेल्या अर्थसंकल्पात दिव्यांगांची निराशा या सरकारने केली. राज्यातील दिव्यांगांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष पसरलेला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख, नवनाथ औटी, गणेश महाजन, सुनील वाळके आदी उपस्थित होते.
----
१४ शेवगाव दिव्यांग
शेवगाव येथे दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.