राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होण्यास अजून २० ते २५ दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र या ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसताना व काम बाकी असताना रेल्वे विभागाने २९ मार्च रोजी सकाळी राहुरी रेल्वे स्टेशन येथील गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, तसा राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे प्रबंधक यांना संदेश देण्यात आला आहे, तर रेल्वे स्टेशन येथील गेटवर रेल्वेच्या कामासाठी गेट २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचा फलक लावण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना व प्रमुख ग्रामस्थांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले.
उपसभापती रवींद्र आढाव, उपसरपंच बाळासाहेब पेरणे, माजी संचालक शरदराव पेरणे, सरपंच संदीप म्हसे, अनिल पेरणे, प्रवाशी संघटनेचे सचिव मंगल जैन, सर्जेराव म्हसे, मधुकर धसाळ, विकास कल्हापुरे, भाऊसाहेब देशमुख, केशव पेरणे, लक्ष्मण पेरणे, चंद्रभान पेरणे, गंगाधर पेरणे, विनित धसाळ आदी उपस्थित होते.
..........
पर्याय काढण्याची गरज
तहसीलदार शेख यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्माण झालेली समस्या निदर्शनास आणून देत पर्याय काढावा अशा सूचना केल्या आहेत. राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे ठिकाणी दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर दूध उत्पादक, शेतकरी, सामान्य नागरिक यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाल्याने या प्रश्नी लवकर मार्ग न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.