नेवासा : ज्ञानोबा माउली तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय भगवान की जय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय, असा जयघोष करीत महाराष्ट्रात शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासा) येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी १० वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सुमारे बाराशे महिला व पुरुष भाविक दिंडीत आहेत. आज सकाळी प्रस्थानापूर्वी भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करून भगवान दत्तात्रयांना मंदिर प्रांगणात ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. भास्करगिरींसह आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार नामदेव टिळेकर, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत कान्हू, आण्णा दाणे, काशीनाथ नवले, राम विधाते, जगन्नाथ खोसरे, लाला शेख यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. दिंडीच्या स्वागतासाठी अग्रभागी देवगडच्या गुरुदत्त विद्यालयाचे झांज पथक, त्यामागे भक्तिगीते गाणारे बँण्डपथक, पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ज्ञानोबा माउली, तुकारामाचा गजर करीत शिस्तीत चाललेले झेंडेकरी, भजनी पथक, वारकरी, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला, असे दिंडीचे स्वरूप होते. प्रस्थान झाल्यानंतर मुरमे गावात आप्पासाहेब वरखडे, ग्रामसेवक कैलास शेळके यांनी स्वागत केले. बकुपिंपळगाव येथे दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत करून भोजन दिले. देवगड फाटा येथे हाजी हुसेन शेख, इकबाल शेख यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. खडकाफाटा येथे दिंडीने विसावा घेतला. (तालुका प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देवगड दिंडी सोहळ्यात एकूण १२०० भाविकांचा समावेश असून, यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण बुधवारी नेवासा येथे होणार आहे. ४दिंडी सोहळा प्रस्थान प्रसंगी भक्तिगीते गाणारे बँण्डपथक, पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ज्ञानोबा माउली, तुकारामाचा गजर करीत शिस्तीत चाललेले झेंडेकरी, भजनी पथक, वारकरी, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला, असे दिंडीचे स्वरूप होते. यावेळी रंगलेले अश्व नृत्य लक्षणीय ठरले. दिंडीचे हे ४२ वे वर्ष आहे. आता पावसाची खरी गरज आहे. भरपूर पाऊस पडू दे, शेतकरीराजा सुखी होऊ दे, ओलेचिंब होऊन आम्ही भिजलो,आजारी जरी पडलो तरी चालेल.आम्हाला वैयक्तिक त्रास झाला तरी चालेल. मात्र, सर्वत्र पाऊस पडू दे,बळीराजाला चांगले दिवस येऊ दे,असे साकडे भगवान दत्तात्रयासह विठुरायाला प्रस्थानप्रसंगी घातले आहे. आमच्या वारीची सेवा पांडुरंगाने तन-मन-धनाने करून घ्यावी,सर्व जाती- धर्माच्या बांधवांमध्ये एकोपा नांदावा,सर्वांमध्ये एकच तो ईश्वर नटलेला आहे, याची अनुभूती सर्वांना येऊ दे, अशी प्रार्थना करून पर्यावरण संवर्धनासाठी जागा मिळेल तेथे झाडे लावा, असे आवाहन केले. दिंडीत चालताना एक हाताचे अंतर ठेऊन चालावे,विसाव्याच्या वाटेवर सर्व वारकरी बांधवांनी स्वच्छता ठेवावी. -गुरूवर्य भास्करगिरी महाराज, दिंडीप्रमुख.
देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By admin | Updated: June 29, 2016 00:58 IST