टाकळी ढोकेश्वर : पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडे मार्च २०२० अखेर १३६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेच्या ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षात १९ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ झाली. संस्थेने सभासदांना ८९ कोटी ६८ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. संस्थेला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा झाला. संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून मागील आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ दाते यांनी दिली.
पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पार पडली. यावेळी ते बाेलत होते. संस्थेच्या सतरा शाखा असून पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, शिरूर, आळेफाटा, सुपा येथील शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे ४ हजार २९६ सभासद आहेत. तसेच संस्थेने जिल्हा सहकारी बँक राष्ट्रीयीकृत बँक, शेड्युल्ड बँक एकत्रित ५० कोटी ४० लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. संस्थेचे १५४ कोटी ४८ लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे, असे दाते यांनी सांगितले.
सूत्रसंचालन संचालक रखमाजी कापसे यांनी केले. मागील सभेचे प्रोसिडिंग मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी केले. संचालक सुरेश बोरुडे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष बाळासाहेब सोबले, लक्ष्मण डेरे, मयूर गांधी, सुरेश बोराडे, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, शिवाजी काळे, सुभाष राठोड, कृष्णा उमाप, सुनील गाडगे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात आदींनी ऑनलाईन सहभाग घेतला.
(वा.प्र.)