केडगाव : केडगावच्या (ता.नगर) रेणुका माता मंदिरात गुरुवारी विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच माळेला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.नगर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या केडगावच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळी ६ ते ७ श्री सुक्त पारायण, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा होऊन सकाळी ८ वाजता माजी जि.प. सदस्य सचिन जगताप व सुवर्णा जगताप यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सकाळी आठ ते नऊ यावेळेत अलंकार पूजा व त्यानंतर नैवेद्य व कर्पूर आरती झाली. साडेदहा वाजता पारंपरिक आरती होऊन नवरात्राला प्रारंभ झाला, अशी माहिती पुजारी रवींद्र गुरव यांनी दिली.दरवर्षी वाढत जाणाºया गर्दीमुळे यावर्षीही देवीच्या स्वयंभू तांदळ्याचे दर्शन घेण्यासाठी स्त्री व पुरूष यांच्या स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुखदर्शनाची दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. केडगावहून देवी मंदिराकडे येणारा रस्ता खराब झाला आहे. पुलाचे कठडेही वाहून गेले आहेत. पहाटे अंधारात भाविक दर्शनासाठी अनवाणी येतात. यामुळे बंद पथदिवे व रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे.सहाव्या माळेला मंदिरात देवस्थान समितीच्या वतीने भारुड व देवीच्या लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सातव्या माळेला देवीची यात्रा असते. यावेळी देवीला फुलोरा चढविण्यात येणार आहे . दसºयाला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होमहवन व शस्त्र पूजन होणार आहे.
केडगावच्या रेणुकादेवीच्या मंदिरात घटस्थापना : दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:23 IST