अहमदनगर : डिंभे धरण ते माणिकडोह या दोन प्रकल्पांना जोडणाऱ्या बोगद्यासाठी केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी लोकसभेत केली.
लोकसभेत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची मागणी केली. ते म्हणाले, कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरण व डिंभे कालव्याचे काम झालेले आहे. डिंभे कालव्याचा विसर्ग १ हजार २४० क्युसेक प्रस्तावित आहे. परंतु कालव्याचे नूतनीकरण न झाल्याने साधारण ३५० क्युसेक पाणी जाते. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने १५ किलोमीटर डिंभे ते माणिकडोह यांना जोडणाऱ्या बोगद्याचा प्रस्ताव तयार केला होता. या कामासाठी ३०० कोटींची आवश्यकता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता, हा प्रकल्प राज्य शासनाकडून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ३०० कोटींची तरतूद करावी, जेणेकरून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कर्जत, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी अतिरिक्त दोन टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे विखे यांनी सभागृहात सांगितले.