राहाता : राज्यातील महाविकास आघाडीत केव्हाच बिघाडी झाली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने अवाजवी वीज बीलाचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर सरकारच्या विरोधातील प्रक्षोभ आता प्रकाशगडवर धडकेल, असा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात शुक्रवारी राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सडकून टिका केली. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. पण या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिल पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली. मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात, असेही विखे म्हणाले.
आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नंदाताई तांबे, मुंकूदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर,प्रतापराव जगताप, ओमेश जपे, बाळासाहेब जपे, कैलास सदाफळ, रघुनाथ बोठे, नंदकुमार जेजूरकर, डॉ. के.वाय गाडेकर, सचिन शिंदे, रावसाहेब देशमुख, संजय सदाफळ, विजय बोरकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
...
सरकारमध्येच आता उर्जा राहिली नाही
काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही. त्यामुळे या आघाडी सरकारमध्येच आता उर्जा राहिली नाही. उर्जा राज्यमंत्री या जिल्ह्यातील आहेत तरी शेतकऱ्यांना नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याचे विखे पाटील म्हणाले.
..
०५राहाता बीजेपी आंदोलन
...
ओळी-भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात शुक्रवारी राहाता येथे टाळे ठोको आंदोलन केले.