जामखेड : तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय दगडू आडसूळ (वय ५०) यांनी खाजगी सावकाराचा तगादा आणि सेवा संस्थेच्या कर्जामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे प्रशासन घोडेगावला येण्यास तयार नाही. निवडणुका सुरू असल्याने प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.
आडसूळ यांनी खाजगी सावकाराकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यांना पावणेतीन एकर जिरायत शेती आहे. जोडधंद्यासाठी २०१४ साली त्यांनी सत्तर हजार कर्ज घेतले होते. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कुटुंबाची गुजराण करणे शक्य होत नसल्याने पुन्हा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले. कर्जाचे व्याज फेडण्यासाठी त्यांनी पुन्हा कर्ज घेतले. सततच्या नापिकीमुळे कर्ज वाढत गेले. मागील चार वर्षांपासून ते इंदापूर येथील कारखान्यावर ऊसतोडणीसाठी कुटुंबासह जात होते. यावेळी ते कारखान्यावर गेले होते. खाजगी सावकाराच्या जाचामुळे पंधरा दिवसांपूर्वी कारखान्यावरून परत आले. शेत विकून पैसे देण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा शेतीचा सौदा झाला; पण तो मोडला. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या दत्तात्रय आडसूळ यांनी सात जानेवारी रोजी आत्महत्या केली, असे आडसूळ यांच्या कुटुंबांनी सांगितले.
.............
प्रशासनाशी केला संपर्क
आडसूळ कुटुंबाची हकीकत ऐकल्यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सोमवारपासून कुटुंबाची भेट घेऊन मदतीसाठी कार्यवाही सुरू करण्याचे सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयाला संपर्क केला, तेही तातडीने लक्ष घालणार असल्याचे कळविण्यात आले.
१० आडसूळ