श्रीगोंदा : लिंपणगाव शिवारातील शेंडेवाडी येथील शेतकरी रामदास माने (वय ४८) व शांताराम माने (वय ३१) या काका-पुतण्यांना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसून दोघेही जागीच ठार झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.या दुर्दैवी घटनेमुळे शेंडेवाडी, मुंढेकरवाडी, बाबरवस्ती परिसरात शोककळा पसरली आहे़ शांताराम हा शेताच्या बांधावर पावसाने गवत झाल्यामुळे त्यावर तणनाशक फवारत होता. त्याच्याशेजारीच रामदास गुरांसाठी ऊस तोडत होते़ शांताराम यांचा जमिनीवर पडलेल्या वीज वाहिनीच्या तारेवर पाय पडला. हे पाहून शांतारामला वाचवायला काका रामदास धावले. पण तेही या तारेला चिकटले अन् यात दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. रामदास माने यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले तर शांताराम माने यांच्या मागे आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
शेंडेवाडीत विजेचा धक्का बसून काका पुतण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 13:00 IST