गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी वीज भरणा होणे गरजेचे आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. मात्र, दर महिन्यात होणाऱ्या वीजबिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने खर्च भागविणे अशक्य होत आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे.
वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड लादण्यात आलेला नाही किंवा फसवणूक करण्यात आलेली नाही. केवळ लॉकडाऊनमुळे एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिले द्यावी लागल्याने, ती मीटर रीडिंगप्रमाणे अचूक दुरुस्त करून, जूनमध्ये एकूण तीन महिन्यांचे वीजबिल देण्यात आले आहे, तसेच सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास ती जून महिन्यातून वजा करण्यात आली आहे.
----------
बील भरण्यासाठी हप्त्यांची सोय
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.