अहमदनगर: राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे अर्ज भरून घेतले असून सर्वाधिक अर्ज पारनेर मतदारसंघातील इच्छुकांनी घेतले आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कर्जत-जामखेड मतदारसंघ कॉँग्रेसच्या ताब्यात असतानाही तेथून राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. कोपरगावातून स्वाभिमानी पक्षाचे नितीन औताडे यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला. दरम्यान, प्रदेश पातळीवरील मुलाखती २७ रोजी मुंबईत होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहे. दि. २० तारखेपर्यंत हे अर्ज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अथवा प्रदेश कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्यानंतर जमा झालेले अर्ज प्रदेश समितीकडे पाठविण्यात येतील. तेथे उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. आजपर्यंत ३५ उमेदवारांनी पक्षाकडून अर्ज घेतले असून त्यातील ८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज पारनेर मतदारसंघात गेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, माजी सदस्य मधुकर उचाळे, उदय शेळके, माधवराव लामखडे, सबाजी गायकवाड, काशिनाथ दाते, शीला भाईक व राजेंद्र शिंदे यांनी पारनेर मतदारसंघासाठी अर्ज घेतले आहेत. नगर शहर, श्रीरामपूर, कर्जत-जामखेड, राहाता मतदारसंघ कॉँग्रेसच्या कोट्यात असला तरीही तेथून राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. राहुरी मतदारसंघात माजी आमदार प्रसाद तनपुरे, उषाताई तनपुरे, प्राजक्त तनपुरे, अरुण तनपुरे, दत्तात्रय अडसुरे, शब्बीर शेख, अमोल जाधव यांनी अर्ज घेतले आहेत.संगमनेरमधून रामराव थोरात, कृष्णराव शिंदे, श्रीरामपूरमधून सुनीता गायकवाड, निलेश भालेराव, सुनील क्षीरसागर, विलास ठोंबरे, कर्जत-जामखेडमधून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, नानासाहेब निकत, शहाजी राळेभात, राहातातून राजेंद्र पिपाडा व नगर शहर मतदारसंघातून किरण काळे, विनीत पाअुलबुधे, जाकीर शेख, स्मिता पोखरणा यांनी अर्ज घेतले आहेत. हे पाचही मतदारसंघ कॉँग्रेसच्या कोट्यात आहेत. राष्ट्रवादीकडून इच्छुकांनी घेतलेले अर्ज म्हणजे कॉँग्रेसवर हा एकप्रकारे दबाव मानला जातो. (प्रतिनिधी)ज्या उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष अथवा प्रदेश समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. काहींनी प्रदेश समितीकडे अर्ज दाखल केल्याची माहिती आहे, पण त्यांची नावे समजली नाहीत. बुधवारी इच्छुकांचे अर्ज दाखल होतील. - पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्षदिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जिल्ह्यातील मतदारसंघाचे काय झाले याची उत्सुकता आहे. मात्र त्यासंदर्भातील माहिती जिल्हाध्यक्षांकडे नव्हती.
पारनेरमधून राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी
By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST