अहमदनगर : गोदावरीच्या महापूर व जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे २० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे़ त्यामुळे नदीकाठच्या गावांसह अकोले, संगमनेर तालुक्यातील ५५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली़ अतिवृष्टीचा दोन्ही तालुक्यातील १६५ गावांना तडाखा बसला असून, अकोले तालुक्यातील भात, सोयाबीन, भाजीपाला भुईसपाट झाला़ गोदावरीला पूर आल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा तडाखा बसला़ त्यामुळे सोयाबीन, भाजीपाला,बाजरी, ऊस, मका, तरू, शेवगाव, पेरु, कपाशीचे पीक पाण्याखाली गेले आहे़ गोदावरीला आलेला पूर व जिल्ह्यातील पावसामुळे संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील २११ गावांतील पिकांना फटका बसला़ या गावांतील ५५ हजार ८०२ शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून, आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला आहे़ सरकारकडून त्यावर काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत़ (प्रतिनिधी)
२० हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट
By admin | Updated: August 8, 2016 00:10 IST