अहमदनगर : शिवजयंतीनिमित्त नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेना आणि युवा सेना यांच्या मंडळांनी डीजे लावून ध्वनिपातळीचे उल्लंघन केले. या प्रकरणी संभाजी कदम, परेश खराडे आणि धनंजय गाडे यांच्यासह १४ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी सायंकाळी माळीवाडा ते दिल्लीगेट या मार्गावरून पाच मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. या मिरवणुकीमध्ये हिंदू राष्ट्र सेना, शिवसेनेची युवा सेना या दोन मंडळांनी फुलसौंदर चौक, माळीवाडा व कापड बाजार येथे सीडी सिस्टिमवर मोठमोठ्याने गाणी लावली. तसेच लोकांना नाचवून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण कायद्यानुसार वरील गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही मंडळांची सीडी सिस्टिम आणि ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे परेश चंद्रकांत खराडे (रा. कल्याणरोड, शिवाजीनगर), सागर सुभाष ठोंबरे (रा. माळीवाडा, अहमदनगर), सीडीचालक व मालक तुषार कैलास रानवडे (रा. कासारवाडी, रानवडे मळा, जि. पुणे) ट्रॅक्टर मालक मच्छिंद्र मयूर सुडके (रा. बालिकाश्रमरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष धनंजय सूर्यकांत गाडे (रा. गोविंदपूरा), सीडी मालक रविकांत वाल्मिकराव (रा. हडको, औरंगाबाद), सीडी चालक सुनील दिनकर वाहुळ (रा. शाहुनगर, औरंगाबाद) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तोफखाना पोलीस ठाण्यात शहर शिवसेना या मंडळाचे प्रमुख संभाजी अशोक कदम (रा. माळीवाडा), सीडीचे मालक प्रदीप शिवाजी गायकवाड (रा. कोल्हापूर), वाहनाचे मालक देवराय प्रशांत पाचरणे आणि जनरेटर चालक अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजाभवानी युवा मंचाचे अध्यक्ष सूरज संभाजी शिंदे (रा.शिंदे वाडा, झारेकर गल्ली), डीजे मालक नितीन शिवाजी थोरात (रा. आंबेगाव, पुणे) आणि ट्रॅक्टर चालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, अविनाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील, उपनिरीक्षक गजानन करेवाड यांनी ही कारवाई केली. शिवजयंती उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल डॉ. त्रिपाठी यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि नागरिकांचे कौतुक केले आहे.(प्रतिनिधी)
कदम-गाडे यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: March 27, 2016 23:40 IST