श्रीरामपूर : न्यायालयाने आदेश देऊनही श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने न्यायालयात तपास अहवाल सादर न केल्याने श्रीरामपूरचे कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. व्ही. बुरांडे यांनी पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जगदीश तुकाराम थेटे यांनी श्रीरामपूर पीपल्स बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक उर्फ बस्तीराम हनुमंतदास उपाध्ये व इतरांविरूद्ध भादंवि कलम ४0६, ४0९, ४१८, ४२0, ४२४, ४६५ ते ४७१सह कलम ३४ नुसार अँड. हेमंत थोरात यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर तत्कालीन न्यायदंडाधिकारी विलास गायकवाड यांनी ५ सप्टेंबर २0१२ रोजी गुन्ह्याचा तपास करुन अहवाल सादर करण्याचा आदेश श्रीरामपूर शहर पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्कालीन सहायक निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्याकडे तपास दिला. पण ३ वर्षात पोलिसांनी याबाबत कोणताही अहवाल दिला नाही. अखेर थेटे यांनी त्यांचे वकील थोरात यांच्यामार्फत हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत न्यायालयाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस काढून अहवाल का पाठविला नाही? याचे स्पष्टीकरण मागितले आहे. (प्रतिनिधी) ■ जगदीश तुकाराम थेटे यांनी कोर्टात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार श्रीरामपूरमधील अशोक उपाध्ये] राधाकिसन थेटे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगरपालिकेची स्थायी समिती यांनी संगनमताने फौजदारी गुन्ह्याचा कट करुन सनी टी अँड केक शॉप हे दुकान परस्पर हस्तांतरित केले. |