अहमदनगर : जिल्ह्यातील आठ उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. याबाबतचा आदेश दुपारी नगर पालिका शाखेला मिळाला.शासनाने नगराध्यक्षपदासाठी अडीच वर्षे संपल्यानंतर सहा महिने मुदतवाढ दिली होती. उपनगराध्यक्षांना मात्र ही मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने उपनगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक जाहीर केली होती. या विरोधात कोपरगावच्या उपनगराध्यक्ष मीनल खांबेकर व पाथर्डीच्या उपनगराध्यक्ष दीपाली बंग यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानंतर वरील निवडणुकीस स्थगिती देण्यात आली. याबाबतचा आदेश मिळाल्याची माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी खोसे यांनी दिली. (प्रतिनिधी)जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी, राहाता, देवळाली प्रवरा, राहुरी व पाथर्डी येथे उद्या निवडणूक होणार होती. यात श्रीगोंदा पालिकेचा समावेश नव्हता. निवडणुकीला स्थगिती मिळाल्याने विद्यमान उपनगराध्यक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी न्यायालयाची स्थगिती
By admin | Updated: June 24, 2014 00:03 IST