अहमदनगर: प्रभागातील समस्या मांडण्यासाठी नागरिकांना महापालिकेत किंवा नगरसेवकांच्या दारात हेलपाटे मारण्याची गरज आता राहणार नाही. नगरसेवकच नागरिकांच्या दारात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. स्वत:च्या प्रभागापासून डागवाले यांनी या उपक्रमास सुरूवात केली. स्थायी समितीचा सभापती झाल्याने जबाबदारी वाढली आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात हा त्यामागील उद्देश आहे. अनेकवेळा नागरिकांना नगरसेवक भेटत नाही किंवा नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन प्रभागाची पाहणी केली जाईल. महापालिकेचे अधिकारीही या पाहणीवेळी सोबत असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविता येतील अशी माहिती डागवाले यांनी दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. प्रत्यक्ष जागेवर गेल्याशिवाय समस्या कळत नाही. महापालिकेचे अधिकारी शहरातील समस्या सोडविण्यासाठी कधी फिरत नाहीत, त्यामुळे हा उपक्रम नगरकरांसाठी उपयुक्त असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. डागवाले यांच्यासोबत नगरसेवक सुवेंद्र गांधीही सहभागी झाले होते. प्रभाग २१ मधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी फेज २ योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे डागवाले म्हणाले. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात, येणार्या अडचणी सांगाव्यात असे आवाहन डागवाले यांनी केले. (प्रतिनिधी)
‘नगरसेवक आपल्या दारी’
By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST